कवी मरतो.

कवी मरतो. कवीला कुणीही रडत नाही. एक कविताही लिहीली नाही आयुष्यात, कोण रडेल? कवी रडतो. स्वतःच, मेलेला.

रस्ता असा अफाट. धुळ अन् धुळ नुसती. चौखूर धावावेत घोडे – धूळ, धूळ –  पण नसावं साधं कुत्रंही. कवी कडेला पडलेला. मध्येही पडू शकला असता, पण पडला कडेवर, अकारणंच. कवीला न हात, न पाय. कवीला नुसतं शरीर, ओझं. रस्त्यावर नसलेली वर्दळ, कुठेच न उडणारी धूळ, हालू नये वा-याचं पानही, अन् हालायला पानंही नाही चौफेर. डोळ्याच्या अंतापर्यंत धूळ, चौखूर.

कवी आपला असाच पडलेला.  नाही म्हणायला दोन-चार माश्या. कवी असा निश्चल – हतबद्ध, हतबल. नुसता पाहतोय टकमक – अंधार की उजेड इतकीही नाही जाणीव. नसलेलं कुत्रं येऊन अंगावर मुतलं तरीही कवी राहील निश्चल. तडफडेल, मरेल लाचार.. पण हलणार नाही. कवीला न हात, न पाय.

कवीला लागतील मुंग्या, कवीवर बसेल धूळ, कवी वाळेल तपत्या उन्हात, कवीला सुटेल वास, कवीला लागतील अळ्या. डोळ्यात करूण हतबलता, रडेल कवी आतल्या आत.. बाहेरही ओघळेल कदाचित एखादा थेंब.. धूळ, धूळ.  रस्त्याच्या कडेला पडलेला कवी – मख्ख – उठू? – भळभळ वाहील करूणा.  माश्या, मुंग्या, कवी.. मग धूळ.. मग नुसतीच धूळ…

About GD

A 30-something guy. Everything else is open; you read my blogs. Find me on twitter @aintgd to keep in touch.
This entry was posted in मेलेल्या माणसाची डायरी and tagged , , , , , . Bookmark the permalink.

यावर आपले मत नोंदवा