काँग्रेस जिंकेल

​खूप खूप वर्षांआधी माझ्या डोळ्यांवर जेव्हा अज्ञानाची झापडं होती तेव्हा काँग्रेस म्हटलं की वाटायचं हा काय पक्ष आहे? याला काही विचरधारा वगैरे आहे की नाही? तेव्हा कळंत नव्हतं.

आत कळतं, काँग्रेस म्हणजे आपणंच.. सगळ्यांनी गुण्यागोविंद्यानं रहावं, आपापलं काम करत रहावं, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जावं, आपल्या घरची भाकर त्याला द्यावी, त्याच्या घरची भाजी आपण खावी, पडत्याला हात द्यावा.. याच तर पायावर काँग्रेस उभी राहिली.

काँग्रेसनं कधी पोकळ अन् भपकेबाज आशावादानं लोकांना दिपवून टाकण्याचा यास नाही केला. काँग्रेस चालत राहिली, चुकतमाकत, घोडचुका करत, सावरत पुढे चालत राहिली.

गेल्या सत्तर वर्षात आपण करोडो लोकांना गरिबीतून वर उचललं. यात लोकांचंच श्रेय खरं. पण काँग्रेसनं निदान त्यांना पोषक वातावरण दिलं. आज आपली पोटं भरलेली आहेत तर दोन रूपयात गहू तांदूळ देणं आपल्याला आळशी वृत्ती वाढवणं वाटतं. पण साधं अर्थशास्त्र पाहिलं तर  गरिबांचा मूळ खाद्यपदार्थांवरचा खर्च कमी झाला; थोडे पैसे शिलकित पडू लागलेत. तेच इतर घरगुती विकासात कामी लागू लागली. मुलं शिकायला लागली. समाजा-समाजात तेढ हा स्थायीभाव न बनू दिल्यामुळे एकंदरीतच समाज इतर विकासाच्या कामात डोकं लावू शकला. समाजाचा आर्थिक विकास झाला, समाजात विज्ञान हळूहळू का होईना रुजत गेलं. आज अवघ्या जगाची बाजारपेठ आपल्याला खुली आहे, आज आपल्या करोडो लोकांच्या हातात मोबाईल फोन आहे, आपल्या मुलांची बोटं संगणकांशी खेळत आहेत, या सगळ्या घडामोडींच्या पाठीशी पडद्यामागे काँग्रेस आहे.

काँग्रेसनं कधी या गोष्टींचा गाजावाजा नाही केला, न कधी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आपल्या पद्धतीनं भारतीय समाजाला, देशाला समोर नेत राहिली.

असं नाही की काँग्रेसमध्ये काही उणीवा नाहीतच. पण मोठ्या लोकांच्या अंगी असते तशी चुका स्विकारण्याची विनम्रताही काँग्रेमध्ये आहे. काँग्रेस चुकते, शिकते. काँग्रेस परिपुर्णपणाचा आव आणत नाही. काँग्रेस सतत विकसनशील आहे. ती विकसित होत राहील. काँग्रेस उठेल. आज नाही तर उद्या, काँग्रेस जिंकेल.

Posted in आम्ही भारताचे लोक | Tagged | यावर आपले मत नोंदवा

BAMS बद्दल काही विचार

​BAMS या कोर्सबद्दल माझे काही फारसे चांगले मत नाही. जो कुणी मला याबद्दल विचारेल, त्याला मी हेच सांगतो. हुशार मुलंमुली असतील तर त्यांना BA करायचा सल्ला देतो, पण BAMS नाही.

आयुर्वेदाचं एकुणच शिक्षण जुनाट-वळणी, पाठीमागे डोळे असलेलं आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासकांना चिकित्सा रुचत नाही. श्रद्धा हवी आहे. “रजोतमाच्या पार गेलेले ते महात्मे असत्य बोलतीलच कशाला?” असा प्रतिवाद आहे.

इथे एक समजून घ्यावं. चरक-सुश्रुतांबद्दल मला नितांत आदर आहे, पण तो यासाठी कि त्यांनी चिकित्सा केली, प्रयोग केलेत. BAMS च्या साडेपाच वर्षात आम्ही चिकित्सा करत नाही, तर अधिकाधिक श्रद्धेनं अंध होण्यावर आमचा जोर असतो. पुढेही क्लिनिकल स्टडीज़ मध्ये randomised/blind ट्रायल्स करत असूच तर त्याची माहिती फारशी कुठे मिळत नाही. आम्ही पारदर्शी नाही. समजदार रुग्णांनी tricky प्रश्न विचारले तर आम्हाला उत्तरे देता येत नाहीत. उदा. “या औषधात आर्सेनिक/मर्क्यूरी आहे, हे सेफ आहे माझ्यासाठी?” आपण शोधन इ. मम्बोजम्बो सांगून समजवतो. किंवा उदा. “मी हाय ब्लड प्रेशर साठी आयुर्वेदिक औषधी सुरू केली १५ दिवसांपासून, आता माझी ॲलोपॕथीक औषधं बंद करू?” आपल्या ट्रीटमेंटवर आपला विश्वास नाही, कारण कधीकधी ती काम करही नाहीत हे आपण जाणतो.

मी आयुर्वेदातून सुटलो. मी अजूनही स्वतःवर आयुर्वेद वापरतो, पण मुख्यतः जीवनशैलीच्या संदर्भात. चुकून आजारी पडल्यास मी चुकूनही आयुर्वेदीक डॉक्टरकडे जात नाही.

(आयुर्वेदाच्या माझ्या काही शिक्षकांबद्दल मला ब-यापैकी आदर आहे, पण त्याला वेगळी वैयक्तिक कारणं आहेत).

Posted in प्रवर्ग नसलेले | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

ऋषी नागडा निजतो

​ऋषी नागडा निजतो

दारं खिडक्या लावून
काळी सावली अंधाराची

फिरते

यावर, त्यावर

जे ते करपत जाते

काय? सूंदर.
कुठल्याही सौंदर्याला थारा नाही.

फांदी? पाखरू? – जा, मर!
अंधाराच्या धागे

मेंदूतून इकडे तिकडे

झोप? कशाला, कसली?

नुसता लिंगाशी चाळा

हातापायांना झटके

अन् गळफास!
गळफास जिवाची सुटका

गळफास दोर स्वर्गाचा

अन् झोप!
अंधार, सुंदर, गारेगार.

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

कवी मरतो.

कवी मरतो. कवीला कुणीही रडत नाही. एक कविताही लिहीली नाही आयुष्यात, कोण रडेल? कवी रडतो. स्वतःच, मेलेला.

रस्ता असा अफाट. धुळ अन् धुळ नुसती. चौखूर धावावेत घोडे – धूळ, धूळ –  पण नसावं साधं कुत्रंही. कवी कडेला पडलेला. मध्येही पडू शकला असता, पण पडला कडेवर, अकारणंच. कवीला न हात, न पाय. कवीला नुसतं शरीर, ओझं. रस्त्यावर नसलेली वर्दळ, कुठेच न उडणारी धूळ, हालू नये वा-याचं पानही, अन् हालायला पानंही नाही चौफेर. डोळ्याच्या अंतापर्यंत धूळ, चौखूर.

कवी आपला असाच पडलेला.  नाही म्हणायला दोन-चार माश्या. कवी असा निश्चल – हतबद्ध, हतबल. नुसता पाहतोय टकमक – अंधार की उजेड इतकीही नाही जाणीव. नसलेलं कुत्रं येऊन अंगावर मुतलं तरीही कवी राहील निश्चल. तडफडेल, मरेल लाचार.. पण हलणार नाही. कवीला न हात, न पाय.

कवीला लागतील मुंग्या, कवीवर बसेल धूळ, कवी वाळेल तपत्या उन्हात, कवीला सुटेल वास, कवीला लागतील अळ्या. डोळ्यात करूण हतबलता, रडेल कवी आतल्या आत.. बाहेरही ओघळेल कदाचित एखादा थेंब.. धूळ, धूळ.  रस्त्याच्या कडेला पडलेला कवी – मख्ख – उठू? – भळभळ वाहील करूणा.  माश्या, मुंग्या, कवी.. मग धूळ.. मग नुसतीच धूळ…

Posted in मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सुबह करना शाम का लाना है जू ए शीर का

दिवसचे दिवस ढकलतो तेव्हा आपण कोण असतो? जानेवरीची दोन तारीख म्हणजे काही विशेष नाही. दिवसचे दिवस येतात आणि जातात. वर्ष जातात. कुणाचं कशानं काही अडत नाही. असंच काहीतरी स्वतःशी बडबडत मी सकाळची संध्यकाळ करतो. निरर्थक गोष्टी करत राहतो.

गालिब आठवायला मला निमित्त लागत नाही.  चहा घ्यायच्या मिषाने उगीच भटकतो.  निरर्थकता.  मी उदास असतो असंही नाही. खरंतर मी इतका निःसंग असतो की माझा मलाही जाणवत नाही. पण वेळ जात नाही. हे सगळं येणंजाणं फार जड. सारखं भारीपण. वांझ गर्भारपण. मी चालतो. रडत नाही इतकंच, फारसा काही फरक नाही. नाही. दायम पडा हुवा तेरे दर पर नहीं हूं मैं, खाक ऐसी जिंदगी पे के पत्थर नहीं हूं मै.. क्यूं गर्दिशे मुदाम से घबरा न जाये दिल, इन्सान हूं प्याला ओ सागर नहीं हूं मै.. कविता नुसत्या अर्थाचीच असते असं कुठेय? A poem is what it makes you feel.

मला उत्तर सापडत नाही. मला माझी स्थितीही कळत नाही. स्थिती की गती तेही कळत नाही. गतीच असेल तर खरंच मी कुठेतरी जातोय की नुसताच फिरतोय तेही कळत नाही. कुठला रसातळ कुठल्या वाटेत कोण जाणे? माझं रसातळात जाणंही इतकं काव्यमय असेल कुणाला कळणारही नाही की मी कुठे पोहचलोय. माझा पाय धसत असेल कुणाला कळणारही नाही. जग सुंदर आहे म्हणून सगळं दुःख. सगळं सुटायची भिती. म्हणून जिवंत रहायची धडपड.

तुम्ही नुसरत ऐकता? मी ऐकतो. कंटाळा येईपर्यंत ऐकतो. मग एक-दोन दिवस नुसरत नको म्हणून असंच काहीतरी ऐकतो; नुसरत जाणिवपुर्वक नाही. मग परत नुसरत. मी आताही नुसरत ऐकतोय. हे लिहिणं असंच विनाकारण आहे. कित्येकांना मी प्रचंड दुःखी वाटतो. मला मी स्वतः दुःखी वाटत नाही. मला मी अकारण वाटतो. मला वाटतं की एक मीपण नुसतंच वाया जातंय. उरलो उपकारापुरता.. एखादा माणूस ज्यानं आयुष्यात कधीच काहीच केलं नाही – सगळं नुसतं होत गेलं – अश्या माणसाचा नमुना म्हणून माझा पुतळा म्युझियममध्ये ठेवायला हवा. पण ठेवेलही कोण? नितांत passivity च्या जोरावर आला दिवस ढकलतांना फक्त एवढी काळजी घ्यावी की status quo विस्कटू नये. विस्कटण्यानं passivity तुटते. मी लटकत राहीन, तुटलो त्या दिवशी पडेन खाली.

Posted in ग़ालिब अनुभवावा, मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

हम जो तारीक राहों में मारे गये.. (मेलेल्या माणसाची डायरी – भाग २)

कधीकधी वाटतं एखादं नोटबुक असावं जवळ – आधी असायचं तसं – सुंदर नवनीत किंवा क्लासमेटचं. दर्जेदार पानं, ओळींदरम्यान चांगली ऐसपैस जागा.  मग मी एक नवीन पेन विकत घेईन, सुंदर चालणारा – आधी असायचा तसा..

आधी किती छान असायचं सगळं!  वही, पेन, अक्षर, लिहिणं.. सतत काहीतरी डोक्यात घोळत राहायचं. आपण तसंच ते कागदावर उतरवत राहायचो.  स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस म्हणतात तसं.. अजुनही कधीकधी पेन उचलायची इच्छा होते.. पण मन धजावत नाही..

संध्याकाळ झाली की घरी जायचं.  (माझं सध्याचं घर म्हणजे दोन बेडरूम, एक हॉल, एक किचन, डायनिंग हॉल, अजून काही काही, आणि त्यात राहतो मी एकटा)!  अंथरूण समोरच्या घरात पडलेलं असतं.. (आधी असायचं तसं.. पण तेव्हा कधीकधी ते आवरूनही ठेवायची इच्छाही व्हायची..).  मी लॅपटॉप काढतो.. एखादी मुव्ही लावतो.. डोक्याला विचार करायला वेळ मिळू नये..

आजकाल ही स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस फार भितीदायक वाटते.  स्वतःला एकटा वेळ देणं बंद केलंय केव्हाचंच. उठायला सकाळी ९:२० चा अलार्म लावलाय (आधी ५ ला उठायचो, अलार्मची गरजही नव्हती वाटंत कधी..  अन्‌ मग फिरायला रस्त्यावर..).  ९:२० ला उठल्यावर तयार व्हायचीच घाई.. डोक्यात काही विचार यायला चान्स द्यायचा नाही.  बुधवार, गुरूवारपासूनच शनीवारची भिती वाटायला सुरुवात होते..

काल उगीच काहीतरी डाऊनलोड करत होतो.. नस्सिम निकोलस तालेबचं कुठलंसं पुस्तक चाळता-चाळता आलं – “To  become a philosopher, start by walking very slowly.” त्या दिवसांमध्ये हेच एक होतं – चालणं.. उगीच रस्त्यांवर चालणं, जायचं कुठेच नाही.. चरैवेति.. चरैवेति.. स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस.. वाहत्या पाण्याचं वाट काढत जाणं..  घरी यायचं, नोटबूक अंथरुणावरंच असायचं, उशीखाली.. लिहिणं सुरू.. तेव्हा किती निर्भिक होतो आपण! अगदी कशाचीच भिती नव्हती वाटंत – कुण्या माणसाची नाही, समाजाचीही नाही.. या मधल्या वर्षांनी आपलं पुरतं मांजर करून टाकलं..

त्या दिवशीही आपण गेलो असतो बाहेर तर काय बिघडलं असतं?  भांडण झालं असतं कदाचित.. तमाशा झाला असता.. याची खरंच भिती वाटते आता..  आताही फोन वाजला तर न उचलायचीही भिती वाटते.. का? … का? एक उदास सुस्कारा सोडायचा फक्त…

असो.. माझ्या लिहिण्यात व्यत्यय येतंच राहतात.. या व्यत्ययादरम्यान उगीचंच फैज़ची एक ओळ आठवली.. हम जो तारीक राहों में मारे गये.. (ह्या असल्या random ओळी मला कुठल्याही random वेळी का आठवतात कुणास ठाऊक?  कशात काही नसतांना आज ही ओळ का आठवावी? पण नंतर पाहावं ही ओळ या मनस्थितीला ब-यापैकी पूरकंच वाटते.. काहीही आपंल असंच..)

नोटबूकचं काय?  नको… नाहीच जमणार ते आपल्याला.. आता फारफार तर एखादं पान लिहितो आपण.. हे असं कुठवर चालणार हेही आपल्याला माहित नाही.. तसं पाहिलं तर आपल्याला काहीच माहित नाही.. आपण आला दिवस ढकलतोय.. फार विचार न करता.. कारण विचार करायची भिती वाटते आपल्याला आता.. मोकळं सोडलं तरी उडत नाही आपण .. आपण मेलोय आधीच, अन्‌ एक मरण जगतोय.. आता मेलेल्या माणसाला कशाला डायरी अ‌न्‌ कशाला काय…?

Posted in मेलेल्या माणसाची डायरी | Tagged , , , , , | यावर आपले मत नोंदवा

मेलेल्या माणसाची डायरी

समजा आपला मृत्यू झालेला आहे. आपण असं आता कुणी अस्तित्वातच नाही. आपण म्हणून आपण नुसतं आपलं नसणं अनुभवतोय. आहे ते बरं आहे, की नाही त्यामुळे काही गलबलून येतंय – कशाचा कशाला आपल्याला पत्ता नाही. आपण नुसतं शांतपणे सगळं पाहत आहोत (किंवा आपण पाहतोय हा नुसता आपला समज आहे).

किती लोकांचं काही बिघडेल? बॅंक पेन्शन देईल? दोन वर्ष होतायत आता सर्विसला. काय मिळेल माहित नाही. एकदोन इंशुरन्स आहेत छोटेमोठे. आपण ॲक्सिडेंटने मेलेलो असलो तर कदाचित ॲक्सिडेंटल इन्शुरन्सचे २० लाख मिळालेले असतील. ती करेल त्याला व्यवस्थित इन्वेस्ट. साधी एफडी ठेवली तरी १५ हजार वगैरे होतात महिन्याला. पण आपण असेच मेलेलो असलो तर? म्हणजे असंच काहीतरी खरडता-खरडता झोप लागली आणि दुस-या दिवशी उठलेलोच नसलो तर. काही सांगता येत नाही. आज काढलेला इंशुरन्स तर अजून सुरू पण नसेल झालेला. जीवनज्योतीचे दोन लाख असतील कदाचित..

त्याला काही अर्थ नाही. आपण मेलेलो आहोत. कदाचित आता चाललंय तेवढं सुरळीत नाही चालणार, पण चालेल सगळं.

मेल्यावरही आपण असंच डुकरासारखं ओठांचा चंबू करून बसलेले असू का? क्लीन, क्लियर, काम तर आपण नाहीच, जीवंतपणातही नव्हतो कधी (calm असे काम लिहावे, मेल्यानंतर तेही सांगता येणार नाही).

मेल्यावर आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणजे आपण हतबल असतो. मग तसं पाहिलं तर आत्ता आणि मरण यात काही फार फरक नाही. ही जीवंत हतबलता, ती अचेत हतबलता. मग तसंच पाहायचं म्हटलं तर जीवंत हतबलता म्हणजे अजुनच दुःखकारी. हतबलता आणि जीवंत काय?

मरण सचेत असायला असायला हवं होतं. पण मग सगळं कधीच संपणार नाही. हे असंच चाललेलं असेल. मी असेल, पण हतबल – ना फोन, ना लॅपटॉप, ना पुस्तक, ना गाणं.. किंवा गाणं असेलही कदाचित. सूर कानांवर पडत राहतील. तेवढ्याच जीवंतपणाच्या काही आठवणी. किंवा आठवण हा प्रकारही संपलेला असेल तोपर्यंत..

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , , | १ प्रतिक्रिया

मराठीतून उर्दू शिका

उर्दूचा पहिला धडा, फक्त एक उदाहरण म्हणून; उर्दू मुळीच कठीण नाही.

Posted in उर्दू वगैरे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

मग परत सगळं शांत

आज तुझ्या नावानं दुसर्‍या कुणाला हाक मारली,
जरासं काहीतरी हललं.

मग परत सगळं शांत!

Posted in स्फूट लिखाण | Tagged , | 4 प्रतिक्रिया

मज्मूं ए ख़याल

ग़ालिबवर लिहावं असं खूप दिवसांपासून मनात.  सुरूवातंच होत नाही.  कारणं अनेक.  ग़ालिब आसपासच असतो नेहमी.  कधी हे तर कधी ते.  काय लिहावं?  भारी कवी.  उपखंडात तरी तोड नाही, बाहेरचं आपण वाचलं नाही म्हणून बोलत नाही.

तर एकेका शेरावर जसजसं येईल तसं लिहावं हा विचार.  शेर आपल्याला उलगडतो तसा!  बाकी कुणाला कसा कुणाला कसा भावतो.  आपण आपल्या अंगानं जावं.  आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवला तेवढा देव आपला.

सुरुवात कुठून करावी हाही एक प्रश्नच.  त्या बुवानं “नक्शे फ़रियादी” पासून सुरूवात करून आधीच कित्येकांचं (अस्मादिकांसह) प्रश्नचिन्ह करून टाकलंय. आपण मधूनच सुरूवात करू, अन्‌ भटकू उगीच इकडेतिकडे.

प्रसंगाला साजेशा एका शेरापासून सुरूवात करतोय.  इतक्या दिवसांपासून ग़ालिब वाचतोय, पण कालपरवा डोळ्यात भरला हा.  मागे दोनेक वर्षांपुर्वी कधीतरी मास्तर किंवा कैलाशबरोबर यावर चर्चा झाली होती असं अंधुकसं आठवतंय :-

तालीफ़ ए नुस्खहा ए वफ़ा कर रहा था मैं
मज्मूं ए ख़याल अभी फर्द फर्द था

वफ़ेच्या नुस्ख्याची तालीफ़ करायला बसलोय तर खरा मी, पण माझ्या ख़यालांचा मजमूं मात्र अजून फर्द फर्द आहे.  तुझ्या प्रेमाच्या गोष्टींबद्दल लिहायला बसलोय, काय लिहायचं हा विचारांचा मजकूर मात्र अजून सगळा अस्ताव्यस्त आहे.

तेव्हा यातलं फर्द-फर्द मजेशीर वाटायचं.  आणि आता जेव्हाही मी लिहायला बसतो, माझ्या खयालांचा मज्मूं नेहमीच असा फर्द फर्द झालेला नसतो का?

ताजा कलमः मला ताजी कलमं लावायचा फारच षौक, कदाचित तुला P.S. I Love You आवडतो म्हणून.  तर, मला फारशा न समजलेल्या (म्हणून फारशा मनात न भरलेल्या) गज़लेतला हा शेर.  जाता-जाता या गज़लेचा मक़्ता तेवढा नोंदवून जातो, तो मला फारच आवडलेला कधीतरीः

ये लाश ए बेक़फ़न असद ए ख़स्ता जां की है
हक़ मग़फिरत करे, अजब आज़ाद मर्द था…

याबद्दलही बोलू परत कधीतरी.  मी आहे, आणि ग़ालिबही आहेच!

परत ताजा कलमः फैज़ने (ज्याला सुरेश भट आशियाचा महाकवी म्हणतात) त्याच्या समग्र कवितांच्या संग्रहाला नुस्खहा-ए-वफ़ा असं नाव ठेवलंय, या शेरावरून.

Posted in ग़ालिब अनुभवावा | Tagged , , , , | 4 प्रतिक्रिया